Free for download only on 4th and 5th March 2020

Saturday 3 June 2023

सुरवात Suruvat

या महिन्यात चाळीस वर्षे पूर्ण होतील मला. त्या निमिताने काही लिहायला घेतले होते. पण मग मनात कल्पना आली की आपण एक साप्ताहिक blog का लिहू नये. मी काय वाचतो आहे, काय करतो आहे हे का share करू नये? त्या मुळे कुणाला काही नवीन इनसाइट्स मिळत असतील तर चांगलेच आहे की! नाही तरी चाळीशी नंतर आता आपण जमा केलेले अनुभवाचे शंख शिंपले मुक्त पणे वाटायलाच हवेत.



दोन आठवडे मस्त हिमालयात राहून आलो. भर उन्हाळ्यात तिथे काय थंडी. मे महिन्यात स्वेटर टोपी घालण्याची मजाच निराळी. आता इथे येऊन घामाच्या धारा. तरीही मन रेंगाळतेय हिमालयात. परत जाण्याची ओढ लागली आहे. सप्टेंबरमध्ये जाऊ का ऑक्टोबरमध्ये याचे ठोकताळे बांधणे चालू आहे. असे काय मिळाले मला हिमालयात? नेहमीच्या ट्रिप पेक्षा ही सहल कशी वेगळी होती? शब्दात सांगणे अवघडच. पण शोध संपला, समाधान लाभले असे मात्र नक्की सांगेन.



लेखन जीव की प्राण. आतून स्पुरते आणि बोटातून उतरते, फार काही विचार नाही, planning वगैरे तर अजिबातच नाही. दिल की बातो मे planning काम नाही करती. मराठीत एवढे लिहीन, चांगले लिहीन, वेगळे लिहीन - कधी विचारही केला नव्हता. माझा एक मित्र आहे दिल्लीत. त्याचे नाव अमोल. तर ह्या अमोलचे एक पेटंट वाक्य आहे , ‘let things happen organically.’ मलाही पटते आहे ही philosophy. आयुष्यात आपण हात धुवून एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो आणि कधी ध्यानी मनीही नसलेल्या गोष्टी अगदी अलगद कवेत येऊन जातात.



तर सध्या काय वाचत आहे माझी आवडती लेखिका सानिया हिचे आवर्तन पुन्हा वाचायला घेतले. आठवड्याच्या मध्येच तिचेच नवे पुस्तक निरंतर वाटेवर टपालाने आले. काय मस्त लिहिते ही बाई. आणि हे मी त्या माझ्याच गावच्या आहेत म्हणून तर अजिबात म्हणत नाही. पण माझ्या आवडत्या लेखिकेत आणि माझ्यात बरेच काही सामान आहे, ही भावना नक्कीच सुखावणारी आहे.



शनिवार, रविवार लोकसत्ता वाचणे म्हणजे तर पर्वणीच. सध्याच्या घडीला सगळ्यात शुद्ध मराठी भाषा वापरणारा एकमेव पेपर आहे हा. आपली भाषा किती समृद्ध आहे याची पदोपदी जाणीव होते वाचताना. शिवाय लेखही अभ्यासपूर्ण, विविधांगी. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मराठीत लिहायला, वाचायला बोलायला हवे.


इंग्लिश मध्ये माझा आवडता पेपर खरे तर हिंदुस्तान टाईम्स. (मी त्यात लिहिले आहे म्हणून नाही) पण मुंबई पुण्याबाहेर तो मिळत नाही. इंडिअन एक्स्प्रेस ही छानच. आता त्यांनी पाने कमी केली हीच एक तक्रार. त्यांच्या अनेक जुन्या पुरवण्या, कात्रणे मी जपून ठेवली आहेत. दर बदलीला त्याचे sorting करून जड अंतकरणाने काही अंक दूर करावे लागतात. पण संपूर्ण संग्रह टाकून देण्याचे मात्र माझे धारिष्ट्य कधीच जाहले नाही.


बरं, नवीन फोन घ्यायचा आहे. मोठा display हवा, 128GB ram हवा आणि २५ हजार पेक्षा महाग नको. काय म्हणता कोणता घेऊ?


No comments:

Post a Comment