Free for download only on 4th and 5th March 2020

Sunday 27 August 2023

जगन्माता

 

जगन्माता कधी काय कसे धडे देईल काही सांगता येत नाही. एक फारशी न आवडणारी व्यक्ती, फारशी पेक्षा न आवडणारीची खरी. आता ह्या व्यक्तीशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असे ठरवले.

पण म्हटले ना नियतीचे फासे वेगळेच पडतात. एक कमिटी गठीत झाली. त्यात आम्ही दोघेच. सोबत काम करणे ओघाने आलेच. तरी ठरवले, फार क्लेश न करून घेता, एकत्र काम करायचे. आता गुण, दुर्गुण सगळेच माहित आहेत. पूर्वी एवढा धक्का नाही बसणार. सगळं छान पार पडलं. त्रास झाला नाही मनाला. कर्तव्य चोख पार पडले.

नंतर आम्ही पुन्हा एकदा एका प्रवासात भेटलो. शेजारी, शेजारी सीट्स. लांबचा प्रवास. बोलणे ओघाने आलेच. फारसे सख्य नसले तरी, आता सोबत न धुसफुसता राहता येत होते.

तुला एक सांगतो,’ ती व्यक्ती म्हणाली, ‘बऱ्याच वर्षापूर्वी मी एका साधुनां भेटलो. म्हणालो थोडा सत्संग करा. तर त्यांनी मला माझा पेशा विचारला. मी वकिली असे सांगितल्यावर ते म्हणाले, तुमच्या कडे नेहमी जगातील असेल नसेल ते सारे दुःख घेवून लोक येतात. त्यांचे ऐका, पण त्यात गुंतू नका. ऐकताना मनातून त्यांचे सगळे छान होईल अशा शुभ भावना पाठवा. खूप महत्वाचे आहे हे, तुझ्यासाठी.’

आपण समोरच्याचे वाईट गुण पाहत बसलो, की नकळत आपल्यात ही तेच उतरतात. चांगले पहिले, की चांगले गुण उतरतात.’

मी महामायेला प्रणाम केला. ती किती संदेश देत असते आपल्याला. कुणा, कुणाच्या मुखातून. आपण फक्त ते ग्रहण करायला receptive राहायचे. जगातील चरचर भगवंताने भरलेला आहे. माझ्या नावडत्या व्यक्तीतही तो आहे. भांडल्याभांडे लागायचेच. पण कधी कधी दुसरे भांडेही असे बरेच काही शिकवून जाते. त्या क्षणी उरसुरल्या भिंतीही गळून पडतात. उरते ती केवळ माझी जगन्माता.

#maheshwrites

No comments:

Post a Comment