Free for download only on 4th and 5th March 2020

Tuesday, 24 May 2022

सुटत काहीच नाही


 

जंगलातून, दिव्य महात्म्यांच्या सहवासात काही चमत्कार घडतात का? असा प्रश्न कुणीतरी विचारला. आज मी जिवंत आहे, माझे श्वास चालू आहेत. मी हिंडू फिरू शकतो, मस्त मजेत. बस, याहून मोठा चमत्कार कोणता हवा? जेंव्हा माझे काही मित्र जे अकाली निघून गेलेले आहेत, तेंव्हा हा चमत्कार अजूनच अधोरेखित होतो.

 

आमच्या  चित्पावनी भाषेत कोणी वारले हे सांगण्यासाठी अमका तमका पुढे गेला, असे सांगण्याची पद्धत आहे. तो पुढे गेला, काही काळाने आपणही त्याला जॉईन होणार आहोत, म्हणून पुढे गेला असे म्हणायचे.

 

आपणही ही एक दिवस जाणार आहोत, आपल्या कडे ही वेळ मर्यादित आहे ही जाणीव असणे हा ही एक चमत्कारच आहे. मग समजते आयुष्यात कशाला महत्व द्यायचे आणि कशाला नाही ते. वेळेचा सदुपयोग तेंव्हाच खरा करता येतो.

 

रानावनात फिरतो ते बाहेरील चमत्कार पाहण्यासाठी नाही तर आत डोकावून पाहण्यासाठी. तसे तर रोजच, प्रत्येक क्षणी आत डोकावून पहिले पाहिजे, तेंव्हा कुठे रानावनातील निरव शांततेत तुम्हाला खोल आत पाहता येईल. नाहीतर मग mobile वर गाणे लाव, कुणाला तरी फोन लाव असे सुरु होते.  जसे काही मिनिटांच्या world record साठी खेळाडू रात्रंदिवस सराव करत असतो, तेंव्हा कुठे तो त्या लेवेल च्या स्पर्धेत उतरू तरी शकतो, अगदी तसेच. रोजचा सराव असेल, तरच एकांतात, दिव्य स्थानात काही तरी मिळते.

 

काही जण म्हणतील आम्हाला नको चमत्कार. आम्हाला तर ही सगळी कटकट सोडून निघून जायचे आहे दूर कुठे तरी. म्हणजे शांती लाभेल जरा.  सांग ना एखादा आश्रम.

 

भगवा चोला घातला म्हणजे काही सर्वज्ञान झाले असे नाही. ते दिव्य महात्मे सुद्धा अगदी आपल्यासारखे धडपडत असतात, चुकत चुकत शिकत असतात. प्रपंचाच्या विवंचना, सगळे सोडून दिले असले तरी, त्यांना ही असतात.

 

मागे एका खूप मोठ्या साधूने मला एका निर्जन स्थळी नेवून तो आश्रमासाठी घेवू इच्छित असलेली जागा मला दाखवली होती. तो मला उत्साहाने सगळे सांगत होता, दाखवत होता.  त्याच्या डोळ्यात तेच भाव होते जे एका नवीन घर घेणाऱ्या जोडप्याच्या असतील.

 

आणखी एका साधूला अरण्यातील त्याच्या कुटीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची विवंचना होती. झाले असे कि त्याचे गुरूंचे शरीर पूर्ण झाले. याला त्यांचे सगळे दिवस कार्य करावे लागले. सगळ्या साधूंना अशा वेळी बोलवावे लागते, भंडारा करावा लागतो आणि मोठी दक्षिणा द्यावी लागते.

 

 

‘भंडारा चे काही नाही. कितीही लोकांना घालीन जेवायला. पण दक्षिणेत खूप पैसा खर्च होतो.’ तो म्हणाला. त्याचे सारे planning गुरूंच्या निधनाने बिघडले होते.

 

एका नदी किनाऱ्यावर असलेल्या आश्रमातील साधूंना बोअर मारायचे होते. पावसाळ्यात नदीचा रस्ता निसरडा होतो आणि पाणीही गढूळ. त्यांनी forest ranger ला ही पटवले होते. हे काम म्हणजे जंगलातील अतिक्रमण. Forest rangers अनेकवेळा त्यांना आश्रम बनवण्यापासून रोखतात. त्यांचे कामच ते असते. पण साधूही काही कच्च्या गुरुचे चेले नसतात. तेही पटवतात ह्यांना. तर ह्या साधूंनी पटवले ranger ला. काम बेकायदेशीर असल्याने रात्रीच्या वेळेसच करायचे होते. अशा बेकायदेशीर कामांना कामगार double rate घेतात. साधुबाबांची पैश्यांची जुळणी कमी पडत होती. मला म्हणाले देशील का काही हजार. Ranger राजी आहे तोवर काम उरकायला हवे.

 

माझे लक्ष समोरील hand pump कडे गेले. नुकताच एक भक्त त्यावरून पाणी भरून घेवून आला होता. मी म्हटले महाराज समोरच pump आहे, पुन्हा दुसरा कशाला? तर महाराज म्हणाले, ‘अरे तो दुसर्या साधूचा आहे. कधी तरी एकाद दोन बादल्या पाणी आणणे वेगळे. आपल्याला नको का स्वतंत्र hand pump?’

 

दुसर्या एका आश्रमात रात्री जेवण झाल्यावर ते गुरु माझ्याशी गप्पा मारत असताना, आतून शिष्याने विचारले. ‘गुरुजी, दूध खूप उरले आहे. दही लावू का?’ गुरुजी अर्थात हो म्हणाले. पण जंगलात जावूनही ह्यातून सुटका नाही याचे मला हसू आले.

 

साधूंचे एक मंडळ असते. म्हणजे एक संघटनाच म्हणू. अर्ज देवून त्याचे सदस्य व्हावे लागते. अर्जावर फोटो लावेलेला असतो. स्वताचे व गुरुचे नाव असते. सदस्यता शुल्क असते. मी पाह्लेल्या मंडळात प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क होते.

 

त्याही पुढे सदर मंडळात मतदान होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोष अधिकारी आणि सचिव निवडले जातात. मला भेटलेले साधू महाराज कोष अधिकारी होते.  मोठ्या प्रेमाने मला सगळे दाखवत आणि सांगत होते.

 

चित्रकूट येथील राघवदास महाराज मोठा अवलिया माणूस. वय सत्तर च्या आस पास. तोंडात फक्त पुढचे दोन शोभेचे दात. अंगावर फक्त एक लंगोटी आणि तोंडभर हसू. एका रणरणत्या दुपारी त्यांच्या झोपडी वजा आश्रमात खाटेवर पडल्या पडल्या मला म्हणाले होते. ‘वाटले होते, इथे आल्यावर सगळे सुटेल. पण छे सुटत काहीच नाही.’

 

टिप- मी काढलेला हा फोटो माझा सगळ्यात आवडता आहे. तो साधू तेथे बसला होता मस्त composition जमून आले. स्थान अर्थातच गुप्त.

Saturday, 21 May 2022

Marathi Spirtual 1

 

काही दिवसापूर्वी जर का मला कुणी सांगितले असते कि एक दिवस तू धोतर घालून फिरशील तर मी ते हसण्यावारी नेले असते. मागे एका मैत्रिणीने मला सांगितले होते कि मी तिच्या स्वप्नात गेलो होतो. ऐकून छानच वाटले मला. पण तिने जेंव्हा मला सांगितले कि मी धोतर नेसून, मुंडण करून, कपाळावर गंध लावून, इस्कॉन चा संन्यासी बनून तिच्या स्वप्नात गेलो तेंव्हा तर मला खूप राग आला होता.

 

मी खूप अध्यात्मिक माणूस आहे. पण माझ्या अध्यात्मात कर्म कांडाला कसलेच स्थान नाही. त्याचा बाह्य दिखावा तर अजिबातच पसंत नाही. पहुंचे हुए सिद्ध कित्येक वेळा jeans आणि t shirt घालून आपल्या जवळूनही निघून जातात, पण आपण त्यांना ओळखत नाही. कित्येक सिद्ध आपल्या जवळपास असूनही आपल्या डोळ्यांना दिसत ही नाहीत. अर्थात, भगव्या कपड्यातील लोक सिद्ध नसतातच असाही माझा दावा नाही. पण प्रत्येक भगव्या, पांढर्या आणि पिवळ्या कपड्यातील व्यक्ती ही सिद्ध असतेच असे नाही.

 

तुमच्या सारखे मलाही अगदी अलीकडे माहित न्हवते कि वैष्णव साधू पांढरे आणि पिवळे कपडे घालतात, भगवे नाही. सन्यास हा फक्त शैव साधू घेतात. कोणा वैष्णव साधूला नुसते विचारा तुम्ही सन्यास घेतला का, तर ते नाही म्हणतील. वैष्णव साधू बैराग घेतात. हा संन्यासी आणि बैरागी यातील फरक आहे. नागा साधू सुद्धा शैव आणि वैष्णव असतात.

 

तर त्याचे झाले असे कि मी नर्मदा तीरावरील एका छानश्या आश्रमात गेलो होतो. तिथे एक तेवीस वर्षाचा पवन नावाचा, छान तलवार कट मिशा ठेवलेला तरुण मुलगा आचारी होता. स्वैपाक घर दोन खोल्यांचे होते. आतली खोली भिंतीनी बंदिस्त, तर बाहेरची ओवरी वजा असलेली खोली सर्व बाजूने ग्रील लावलेली. माकडांचा उपद्रव होवू नये म्हणून ही सगळी व्यवस्था.

 

पवन ग्रीलच्या खोलीत कणिक मळत होता. त्याच्या समोरचा एवढा मोठा कणकेचा गोळा पाहून त्याला मदत करावीशी वाटली आणि आत गेलो. मधून मधून पवन आत जावून गेंस वर ठेवलेली भाजी हलवून येत होता.

 

मी एकटा, अगदी शंभर जणांचे ही जेवण एकट्याने बनवतो, असे त्याने मला सांगितले तेंव्हा कौतुक वाटले त्याचे. ‘एरवी बनवत असशील रे एकटा  पण आज मी तुला मदत करेन,’ असे मी त्याला सांगितले.

 

‘शेतात विहीर खोदायची आहे. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च आहे. म्हणून मी इथे कामाला आलो.’ पवनने मला सांगितले. पवन ला दर महा मिळणाऱ्या पाच हजार रुपये उत्पनात त्याची विहीर कधी बांधून होयील याचा मी मनोमन हिशोब करू लागलो. तेवढ्यात तेथील हनुमान मंदिराचा तरुण पुजारी आला व मला नम्र पणे म्हणाला कि pants घालून स्वयंपाकघरात प्रवेश नाही. त्या आश्रमात कोणताही जाती भेद पाळला जात नाही हे येथे विशेष नमूद करावे वाटते. अगदी पवन ही ब्राह्मण नाही. पण प्रत्येक जागेचे काही नियम असतात. जसे कि शाळेत uniform च घालावा, swimming pool मध्ये swimming costume च घालावा, तसेच इथलेही काही नियम.

 

मी खट्टू मनाने बाहेर आलो.  पवनने बनवलेले जेवण आयते बसून खाल्ले. पवन च्या हाताला अमृताची चव आहे. पवन कमालीचा स्वछ्य आहे. त्याच्या कडे पाहूनच कळते कि किती चांगल्या घरातला मुलगा आहे.

 

‘कुठे शिकलास इतका छान स्वैपाक करायला?’ मी त्याला विचारले, तर म्हणाला शिकलो बघत बघत. वाटले त्याला आताच ऑफर द्यावी माझ्या कडे येण्यासाठी, पण मनाला रोखले.

 

त्यानंतर पवनचा अनेक वेळा मला फोन आला. पवन चे गाव त्याच्या घरापासून साठ kilometers दूर होते. त्याला त्याच्या घराजवळील शहरात काम हवे होते. म्हंटले ये माझ्या कडेच महाराष्ट्रात. फक्त चार जणांचा स्वयपाक कर, दुप्पट पगार देईन, भावाप्रमाणे ठेवेन, पुढे काही शिकणार असलास तर शिकवेन ही. पण पवन ला त्याच्या घराजवळच काम हवे होते.

 

पवन ला मदत न करता आल्याचे शल्य होतेच. नम्र शब्द वापरून का असेना, मला चक्क स्वैपाक घरातून बाहेर काढले होते. तर त्या आश्रमातून बाहेर पडून थोड्या मोठ्या गावात आल्यावर मी पहिले काम केले ते म्हणजे धोती घेतली. ती नेसणे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे कारण तो पर्यंत मी अख्ख्या जन्मात कधीही धोती नेसलेली न्हवती. तर ही धोती पुढील काही अध्यात्मिक प्रवासाची सोबती बनली.

 

टिप- आश्रमाचे नेमके location मुद्दाम गुप्त ठेवलेले आहे. अध्यात्मिक केंद्रे पर्यटन स्थळे बनू नयेत म्हणून. त्या बाबत विचारणा करू नये.