Free for download only on 4th and 5th March 2020

Showing posts with label #Marathi. Show all posts
Showing posts with label #Marathi. Show all posts

Thursday, 7 September 2023

एकत्र कुटुंब Joint Family

 

एकत्र कुटुंबात राहण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील.

व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी.

मला आठवते आहे आम्ही आजोळी गेलो होतो. माझी मावशी, तिचे सासरे दुसऱ्या दिवशी आले. रात्रभरचा प्रवास होता त्यांचा. रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच.

मामंजीनी पुरी भाजी मागवली. मला अजिबात आवडत नाही पुरीभाजी. कशीबशी खाल्ली.’ मावशी म्हणाली.

अगं, तू तुला जे हवे ते मागवायचे होते ना.’ आई म्हणाली. पण ते काही मावशीला पटले नाही. एकत्र कुटुंबाची एक अलिखित घटना असते, प्रोटोकॉल असतो आणि hierarchy ही असते. ते नियम तुम्ही पाळता तोवर तुम्हाला एकत्र कुटुंबाचे सगळे फायदे मिळतात. जरा जरी बंडखोरी केली तर तुम्ही कळपातून बाहेर, एकटे एकाकी. सगळी मिळकत, resources एकत्र. त्यामुळे अशी बंडखोरी करायचा पर्याय सुद्धा नसतो बिचाऱ्यांकडे.


महिला, कमी कमावणारे, विधवा, अविवाहित, जरठ कुमारिका, जुनिअर मेम्बर्स यांची तर गळचेपी आणखी जास्त. त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय इतर वरिष्ठ सदस्य घेणार. स्वतःच्या मनाप्रमाणे कॅरीर तर दूर, कपडे घालायला ही परमिट राज. एकटे कुठे जाऊन माहित नाही का स्वतःचे स्वतःला कसे सांभाळायचे हे माहित नाही. अशीच एक व्यक्तिरेखा मी माझ्या 'अनुक्रमणिका नंबर अकरा.’ मध्ये रेखाटली.


माझी एक मैत्रीण लग्न झाल्यावर आली नवऱ्याला सोडून. मग मुंबईत नोकरीला लागली. साडी, मंगळसूत्र त्यागून जीन्स टी शर्ट असे आवडीचे कपडे घालून राहू लागली. ‘स्वप्नातही वाटले नव्हते की मी असे कपडे घालीन.’ ती मला म्हणाली.


माझी दुसरी एक मैत्रीण प्रौढ वयात लग्न केले. टिकले नाही. पुण्यात राहून वकिली करते. पण तिचा घटस्फोट झालेला तिच्या घरातील अनेक सदस्यांना माहित देखील नाही. फक्त आई आणि भावाला माहित आहे. रेल्वे जशी जशी तिच्या गावाला जाते तशी ती गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घालून सवाष्ण बनते. घरी वाहिन्यांच्या गुड न्युज कधी या प्रश्नांना हसत हसत सामोरी जाते.

असे दु टप्पी वागण्यापेक्षा तू सरळ सांगून का नाही टाकत.’ मी तिला विचारले.

नाही, मग फार नावे ठेवतात रे. त्या पेक्षा हे असे जगणेच बरे.’ ती म्हणाली. तिच्या सगळ्या भावा बहिणींची लग्ने झालेली आहेत.


तुम्ही मन मुराद कधी जगता याचे यांचे आणि बऱ्याच जणांचे उत्तर हेच आहे की जेव्हा आम्ही आमच्या नोकरीच्या, कामा धंद्याच्या ठिकाणी असतो तेंव्हा. घरी आलो की घरचे नियम पाळावेच लागतात. लपूनछपून सगळेच सदस्य स्वतःला हवे तसे जगण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी ते अनैतिक असतेच असेही नाही. तरीही … हे घर आहे का जेल हा प्रश्न पडतो मला. ह्या लपून छपून प्रकाराला स्वीकृतीही असते, जोवर ते चार चौघात खुले आम केले जात नाही तोवर. दु टप्पी पणाचा कळस.


मी जर का अशा एखाद्या एकत्र कुटुंबात जन्माला आलो असतो तर मी आज जो माणूस आहे तो नक्कीच झालो नसतो. लेखक तर नाहीच नाही. लिहायला बसलो असतो तर सारखे कोणी तरी आले असते विचारायला 'काय लिहितो आहेस, कशा बद्दल लिहितो आहेस.’


स्वतंत्र विचार, विवेक यांचे तर कधीच दमन झाले असते. आज माझी सात वर्षाची चिमुरडी सुद्धा स्वतंत्र विचार करते. मोठी झाल्यावर ती कुणाचेही, अगदी तिच्या बापाचेही म्हणजे माझेही ऐकणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि याचा मला अभिमान आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. स्वतः चे आयुष्य स्वतःच्या मर्जी प्रमाणे जगेल.


मराठी भाषेतील एकच शब्द निवड असे सांगतिले तर मी कोणता शब्द निवदेन माहित आहे? विवेक. माझा शाबूत आहे. पण अनेकांना असे काही असते हेच माहित नाही. झुंडीचे मानसशास्र घरातच तर जन्माला येते. विवेक कुठून जन्माला घालायचा?

#maheshwrites #marathi.

Sunday, 19 February 2023

jatra fair

 

हर्नियाचे ऑपरेशन झाल्यामुळे गेले सोळा दिवस मी घरीच. आज गावची जत्रा.

सगळे चालले आहेत जत्रेला.’ निवा म्हणाली.

आपणही जाऊ.’ मी म्हणालो.

पण तुझा हर्निया.’

हळू गाडी चालवू.’

नकोच.’

अगं, जाऊ. उद्या पासून ऑफिसलाही जाणार आहे.’

फोर व्हीलर.’

नाही. टूव्हीलर. फोर व्हीलर नाही चालवायची अजून काही दिवस. आजी घरी थांबेल. आपण तिघे जाऊ.’

 

 

शहरात मॉल मध्ये कायमच चकचकीत जत्रा. ती तिने पाहिलेली. गावची जत्रा चकचकीत नाही, पण जास्त रंगीत, जास्त रसरशीत. कळत्या वयातली तिची ही पहिलीच जत्रा. अख्ख्या आयुष्यात आकाश पाळण्यात बसली नव्हती त्यामुळे त्यात बसण्याची उत्सुकताही.

तू ही बस.’ म्हणाली.

आताच ऑपरेशन झाले आहे. नको. आई बसेल तुझ्या बरोबर.’ मी म्हणालो.

निवाचा पाळणा वर गेला. मी खाली उभारलेलो. ती मला वरून टाटा करत होती. मी हात हलवला. मला जास्त वेळ उभारवत नव्हते. पण बसायला कुठेच जागा नाही. आयुष्याच्या जत्रेत माझा पाळणा आता सगळ्यात उंच होता. इथून आता उतरणीला लागणार. निवाचा पाळणा आता कुठे वर जायला लागला होता. आईचा पाळणा वरून खाली यायला लागला होता म्हणून ती घरी. आणखी वीस वर्षांनी मी घरी बसेन, निवा तिच्या मुलांना जत्रेत घेऊन येईल.

आकाश पाळण्या नंतर मग मेरी गो राउंड, मग जम्पिंग. तिचे मन भरेना आणि मला उभे राहवेना. मग बर्फाचा गोळा. आयुष्यात आईस्क्रीम तिने अनेक वेळा खाल्ले होते पण गोळा पहिल्यांदाच. कर्कश आवाजाचा भोंगा. तिच्या जीवन अनुभवाची सुरुवात होती आणि मी तिला जे जे हवे होते ते सगळे घेऊन देत होतो.

हे असलं कशाला घेऊन द्यायचे. आधीच मला आताशा कमी ऐकू येते. ‘ आई घरी आल्यावर म्हणाली.

सगळं नवीन आहे तिच्यासाठी. तुझं संपत आलंय, माझं आता आटत जाणार आहे, पण तिची तर सुरुवात आहे. जगण्याचा रसरशीत अनुभवच महत्वाचा असतो. सोनं चांदी किती घातले अंगावर हे नाही आठवणार तिला मोठे झाल्यावर. पण ह्या छोट्या छोट्या आठवणी तिला आयुष्यभर पुरतील. शिवाय मी आहे तोवर सगळी गम्मत. लहानपण आई वडील जिवंत असे पर्यंतच तर असते. ‘ #365daysofselflove #life #marathi #fair #village

Friday, 3 June 2022

sologamy

 

Sologamy वरील एक लिंक मी share केली तर त्यावर हे विचित्र आहे, अनैसर्गिक आहे अशा प्रकारच्या comments आल्या. तर गुजरात मधील एका महिलेने स्वतःशीच विवाह करायचा ठरवला आहे. असा विवाह म्हणजे sologamy. या लग्नात ती स्वतःच स्वतःला वचने देणार आहे. प्रत्येक प्रसंगात, सुख दुखात स्वतःची साथ देण्याची. कायम स्वतःमागे स्वतःच भक्कम पणे उभे राहण्याची.

 

मला ही कल्पना फारच आवडली. ‘पण आपण सतत स्वतः सोबत असतोच कि.’ एक मित्र म्हणाला.

 

पण माझा प्रश्न असा कि आपण खरंच स्वतः सोबत असतो का? उत्तर नाही. आपण सतत अपेक्षांचे ओझे वहात फिरतो. ह्याने माझे हे काम करावे. त्याने मला सन्मानाने वागवावे. कठीण प्रसंगी ह्याने माझी साथ द्यायला हवी होती, ती त्याने दिली नाही. म्हणून दुखः, त्यातून येणारी कटुता. कित्येक वेळा ही दुभंगलेली मने शेवट पर्यंत जुळतच नाहीत. मृत्यू माणूस घेवून जातो, पण कटू आठवणी मनात घर करून राहतात. हा माझ्याशी असे असे वागला, असं त्या माणसाच्या मृत्युनंतर कैक वर्षांनी सुद्धा लोकांना म्हणताना मी ऐकलेले आहे.

 

मी माझे आई-वडील, भाऊ-बहिण, पती, पत्नी, मुले ह्यांच्या कडून अपेक्षा नाही करणार तर कोणाकडून करणार, असे ही म्हणणारे लोक भेटले. अगदी मलाही काही दिवसांपर्यंत असेच वाटत होते. अपेक्षा बांधून पूर्ण कधीच होत नव्हत्या.  पदरी येत होती ती निराशाच.

 

पण ही sologamy concept मला फारच आवडली. कशाला हवी ही अपेक्षा कि कोणी माझ्या मदतीला यावे, कोणी आधार द्यावा, कोणी माझे काहीतरी करावे.

 

स्वतःच रोज स्वतःशी वायदा करावा, मी आहे तुझ्यासाठी. काहीही झाले, तरी मी आहे तुझ्या पाठीशी. तू एकटा कधीच पडणार नाहीस कारण तूच तुझ्यासोबत सदैव राहण्याची शपथ घेतली आहेस.

 

राहता राहिला प्रश्न नैसर्गिक आणि अनैसर्गिक असण्याचा मला सांगा निसर्गात कोणता प्राणी pressure cooker वर अन्न शिजवतो, कोण कपडे घालतो, गाड्या उडवतो, mobile वापरतो? हे सगळे नैसर्गिक आणि कोणी स्वतःच स्वतःची साथ द्यायची ठरवले तर अनैसर्गिक? कमालच आहे बुवा. पण स्वतःच स्वतः सोबत स्वतःच्या निर्णयाच्या पाठीशी राहायचे म्हंटले म्हणजे अश्या टीकेची पर्वा कोणाला?

#365daysofselflove #sologamy #marathi

Tuesday, 24 May 2022

सुटत काहीच नाही


 

जंगलातून, दिव्य महात्म्यांच्या सहवासात काही चमत्कार घडतात का? असा प्रश्न कुणीतरी विचारला. आज मी जिवंत आहे, माझे श्वास चालू आहेत. मी हिंडू फिरू शकतो, मस्त मजेत. बस, याहून मोठा चमत्कार कोणता हवा? जेंव्हा माझे काही मित्र जे अकाली निघून गेलेले आहेत, तेंव्हा हा चमत्कार अजूनच अधोरेखित होतो.

 

आमच्या  चित्पावनी भाषेत कोणी वारले हे सांगण्यासाठी अमका तमका पुढे गेला, असे सांगण्याची पद्धत आहे. तो पुढे गेला, काही काळाने आपणही त्याला जॉईन होणार आहोत, म्हणून पुढे गेला असे म्हणायचे.

 

आपणही ही एक दिवस जाणार आहोत, आपल्या कडे ही वेळ मर्यादित आहे ही जाणीव असणे हा ही एक चमत्कारच आहे. मग समजते आयुष्यात कशाला महत्व द्यायचे आणि कशाला नाही ते. वेळेचा सदुपयोग तेंव्हाच खरा करता येतो.

 

रानावनात फिरतो ते बाहेरील चमत्कार पाहण्यासाठी नाही तर आत डोकावून पाहण्यासाठी. तसे तर रोजच, प्रत्येक क्षणी आत डोकावून पहिले पाहिजे, तेंव्हा कुठे रानावनातील निरव शांततेत तुम्हाला खोल आत पाहता येईल. नाहीतर मग mobile वर गाणे लाव, कुणाला तरी फोन लाव असे सुरु होते.  जसे काही मिनिटांच्या world record साठी खेळाडू रात्रंदिवस सराव करत असतो, तेंव्हा कुठे तो त्या लेवेल च्या स्पर्धेत उतरू तरी शकतो, अगदी तसेच. रोजचा सराव असेल, तरच एकांतात, दिव्य स्थानात काही तरी मिळते.

 

काही जण म्हणतील आम्हाला नको चमत्कार. आम्हाला तर ही सगळी कटकट सोडून निघून जायचे आहे दूर कुठे तरी. म्हणजे शांती लाभेल जरा.  सांग ना एखादा आश्रम.

 

भगवा चोला घातला म्हणजे काही सर्वज्ञान झाले असे नाही. ते दिव्य महात्मे सुद्धा अगदी आपल्यासारखे धडपडत असतात, चुकत चुकत शिकत असतात. प्रपंचाच्या विवंचना, सगळे सोडून दिले असले तरी, त्यांना ही असतात.

 

मागे एका खूप मोठ्या साधूने मला एका निर्जन स्थळी नेवून तो आश्रमासाठी घेवू इच्छित असलेली जागा मला दाखवली होती. तो मला उत्साहाने सगळे सांगत होता, दाखवत होता.  त्याच्या डोळ्यात तेच भाव होते जे एका नवीन घर घेणाऱ्या जोडप्याच्या असतील.

 

आणखी एका साधूला अरण्यातील त्याच्या कुटीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची विवंचना होती. झाले असे कि त्याचे गुरूंचे शरीर पूर्ण झाले. याला त्यांचे सगळे दिवस कार्य करावे लागले. सगळ्या साधूंना अशा वेळी बोलवावे लागते, भंडारा करावा लागतो आणि मोठी दक्षिणा द्यावी लागते.

 

 

‘भंडारा चे काही नाही. कितीही लोकांना घालीन जेवायला. पण दक्षिणेत खूप पैसा खर्च होतो.’ तो म्हणाला. त्याचे सारे planning गुरूंच्या निधनाने बिघडले होते.

 

एका नदी किनाऱ्यावर असलेल्या आश्रमातील साधूंना बोअर मारायचे होते. पावसाळ्यात नदीचा रस्ता निसरडा होतो आणि पाणीही गढूळ. त्यांनी forest ranger ला ही पटवले होते. हे काम म्हणजे जंगलातील अतिक्रमण. Forest rangers अनेकवेळा त्यांना आश्रम बनवण्यापासून रोखतात. त्यांचे कामच ते असते. पण साधूही काही कच्च्या गुरुचे चेले नसतात. तेही पटवतात ह्यांना. तर ह्या साधूंनी पटवले ranger ला. काम बेकायदेशीर असल्याने रात्रीच्या वेळेसच करायचे होते. अशा बेकायदेशीर कामांना कामगार double rate घेतात. साधुबाबांची पैश्यांची जुळणी कमी पडत होती. मला म्हणाले देशील का काही हजार. Ranger राजी आहे तोवर काम उरकायला हवे.

 

माझे लक्ष समोरील hand pump कडे गेले. नुकताच एक भक्त त्यावरून पाणी भरून घेवून आला होता. मी म्हटले महाराज समोरच pump आहे, पुन्हा दुसरा कशाला? तर महाराज म्हणाले, ‘अरे तो दुसर्या साधूचा आहे. कधी तरी एकाद दोन बादल्या पाणी आणणे वेगळे. आपल्याला नको का स्वतंत्र hand pump?’

 

दुसर्या एका आश्रमात रात्री जेवण झाल्यावर ते गुरु माझ्याशी गप्पा मारत असताना, आतून शिष्याने विचारले. ‘गुरुजी, दूध खूप उरले आहे. दही लावू का?’ गुरुजी अर्थात हो म्हणाले. पण जंगलात जावूनही ह्यातून सुटका नाही याचे मला हसू आले.

 

साधूंचे एक मंडळ असते. म्हणजे एक संघटनाच म्हणू. अर्ज देवून त्याचे सदस्य व्हावे लागते. अर्जावर फोटो लावेलेला असतो. स्वताचे व गुरुचे नाव असते. सदस्यता शुल्क असते. मी पाह्लेल्या मंडळात प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क होते.

 

त्याही पुढे सदर मंडळात मतदान होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोष अधिकारी आणि सचिव निवडले जातात. मला भेटलेले साधू महाराज कोष अधिकारी होते.  मोठ्या प्रेमाने मला सगळे दाखवत आणि सांगत होते.

 

चित्रकूट येथील राघवदास महाराज मोठा अवलिया माणूस. वय सत्तर च्या आस पास. तोंडात फक्त पुढचे दोन शोभेचे दात. अंगावर फक्त एक लंगोटी आणि तोंडभर हसू. एका रणरणत्या दुपारी त्यांच्या झोपडी वजा आश्रमात खाटेवर पडल्या पडल्या मला म्हणाले होते. ‘वाटले होते, इथे आल्यावर सगळे सुटेल. पण छे सुटत काहीच नाही.’

 

टिप- मी काढलेला हा फोटो माझा सगळ्यात आवडता आहे. तो साधू तेथे बसला होता मस्त composition जमून आले. स्थान अर्थातच गुप्त.