हर्नियाचे ऑपरेशन झाल्यामुळे गेले सोळा दिवस मी घरीच. आज गावची जत्रा.
‘सगळे चालले आहेत जत्रेला.’ निवा म्हणाली.
‘आपणही जाऊ.’ मी म्हणालो.
‘पण तुझा हर्निया.’
‘हळू गाडी चालवू.’
‘नकोच.’
‘अगं, जाऊ. उद्या पासून ऑफिसलाही जाणार आहे.’
‘फोर व्हीलर.’
‘नाही. टूव्हीलर. फोर व्हीलर नाही चालवायची अजून काही दिवस. आजी घरी थांबेल. आपण तिघे जाऊ.’
शहरात मॉल मध्ये कायमच चकचकीत जत्रा. ती तिने पाहिलेली. गावची जत्रा चकचकीत नाही, पण जास्त रंगीत, जास्त रसरशीत. कळत्या वयातली तिची ही पहिलीच जत्रा. अख्ख्या आयुष्यात आकाश पाळण्यात बसली नव्हती त्यामुळे त्यात बसण्याची उत्सुकताही.
‘तू ही बस.’ म्हणाली.
‘आताच ऑपरेशन झाले आहे. नको. आई बसेल तुझ्या बरोबर.’ मी म्हणालो.
निवाचा पाळणा वर गेला. मी खाली उभारलेलो. ती मला वरून टाटा करत होती. मी हात हलवला. मला जास्त वेळ उभारवत नव्हते. पण बसायला कुठेच जागा नाही. आयुष्याच्या जत्रेत माझा पाळणा आता सगळ्यात उंच होता. इथून आता उतरणीला लागणार. निवाचा पाळणा आता कुठे वर जायला लागला होता. आईचा पाळणा वरून खाली यायला लागला होता म्हणून ती घरी. आणखी वीस वर्षांनी मी घरी बसेन, निवा तिच्या मुलांना जत्रेत घेऊन येईल.
आकाश पाळण्या नंतर मग मेरी गो राउंड, मग जम्पिंग. तिचे मन भरेना आणि मला उभे राहवेना. मग बर्फाचा गोळा. आयुष्यात आईस्क्रीम तिने अनेक वेळा खाल्ले होते पण गोळा पहिल्यांदाच. कर्कश आवाजाचा भोंगा. तिच्या जीवन अनुभवाची सुरुवात होती आणि मी तिला जे जे हवे होते ते सगळे घेऊन देत होतो.
‘हे असलं कशाला घेऊन द्यायचे. आधीच मला आताशा कमी ऐकू येते. ‘ आई घरी आल्यावर म्हणाली.
‘सगळं नवीन आहे तिच्यासाठी. तुझं संपत आलंय, माझं आता आटत जाणार आहे, पण तिची तर सुरुवात आहे. जगण्याचा रसरशीत अनुभवच महत्वाचा असतो. सोनं चांदी किती घातले अंगावर हे नाही आठवणार तिला मोठे झाल्यावर. पण ह्या छोट्या छोट्या आठवणी तिला आयुष्यभर पुरतील. शिवाय मी आहे तोवर सगळी गम्मत. लहानपण आई वडील जिवंत असे पर्यंतच तर असते. ‘ #365daysofselflove #life #marathi #fair #village