एकत्र कुटुंबात राहण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील.
व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी.
मला आठवते आहे आम्ही आजोळी गेलो होतो. माझी मावशी, तिचे सासरे दुसऱ्या दिवशी आले. रात्रभरचा प्रवास होता त्यांचा. रात्रीचे जेवण हॉटेलमध्येच.
‘मामंजीनी पुरी भाजी मागवली. मला अजिबात आवडत नाही पुरीभाजी. कशीबशी खाल्ली.’ मावशी म्हणाली.
‘अगं, तू तुला जे हवे ते मागवायचे होते ना.’ आई म्हणाली. पण ते काही मावशीला पटले नाही. एकत्र कुटुंबाची एक अलिखित घटना असते, प्रोटोकॉल असतो आणि hierarchy ही असते. ते नियम तुम्ही पाळता तोवर तुम्हाला एकत्र कुटुंबाचे सगळे फायदे मिळतात. जरा जरी बंडखोरी केली तर तुम्ही कळपातून बाहेर, एकटे एकाकी. सगळी मिळकत, resources एकत्र. त्यामुळे अशी बंडखोरी करायचा पर्याय सुद्धा नसतो बिचाऱ्यांकडे.
महिला, कमी कमावणारे, विधवा, अविवाहित, जरठ कुमारिका, जुनिअर मेम्बर्स यांची तर गळचेपी आणखी जास्त. त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय इतर वरिष्ठ सदस्य घेणार. स्वतःच्या मनाप्रमाणे कॅरीर तर दूर, कपडे घालायला ही परमिट राज. एकटे कुठे जाऊन माहित नाही का स्वतःचे स्वतःला कसे सांभाळायचे हे माहित नाही. अशीच एक व्यक्तिरेखा मी माझ्या 'अनुक्रमणिका नंबर अकरा.’ मध्ये रेखाटली.
माझी एक मैत्रीण लग्न झाल्यावर आली नवऱ्याला सोडून. मग मुंबईत नोकरीला लागली. साडी, मंगळसूत्र त्यागून जीन्स टी शर्ट असे आवडीचे कपडे घालून राहू लागली. ‘स्वप्नातही वाटले नव्हते की मी असे कपडे घालीन.’ ती मला म्हणाली.
माझी दुसरी एक मैत्रीण प्रौढ वयात लग्न केले. टिकले नाही. पुण्यात राहून वकिली करते. पण तिचा घटस्फोट झालेला तिच्या घरातील अनेक सदस्यांना माहित देखील नाही. फक्त आई आणि भावाला माहित आहे. रेल्वे जशी जशी तिच्या गावाला जाते तशी ती गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घालून सवाष्ण बनते. घरी वाहिन्यांच्या गुड न्युज कधी या प्रश्नांना हसत हसत सामोरी जाते.
‘असे दु टप्पी वागण्यापेक्षा तू सरळ सांगून का नाही टाकत.’ मी तिला विचारले.
‘नाही, मग फार नावे ठेवतात रे. त्या पेक्षा हे असे जगणेच बरे.’ ती म्हणाली. तिच्या सगळ्या भावा बहिणींची लग्ने झालेली आहेत.
तुम्ही मन मुराद कधी जगता याचे यांचे आणि बऱ्याच जणांचे उत्तर हेच आहे की जेव्हा आम्ही आमच्या नोकरीच्या, कामा धंद्याच्या ठिकाणी असतो तेंव्हा. घरी आलो की घरचे नियम पाळावेच लागतात. लपूनछपून सगळेच सदस्य स्वतःला हवे तसे जगण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी ते अनैतिक असतेच असेही नाही. तरीही … हे घर आहे का जेल हा प्रश्न पडतो मला. ह्या लपून छपून प्रकाराला स्वीकृतीही असते, जोवर ते चार चौघात खुले आम केले जात नाही तोवर. दु टप्पी पणाचा कळस.
मी जर का अशा एखाद्या एकत्र कुटुंबात जन्माला आलो असतो तर मी आज जो माणूस आहे तो नक्कीच झालो नसतो. लेखक तर नाहीच नाही. लिहायला बसलो असतो तर सारखे कोणी तरी आले असते विचारायला 'काय लिहितो आहेस, कशा बद्दल लिहितो आहेस.’
स्वतंत्र विचार, विवेक यांचे तर कधीच दमन झाले असते. आज माझी सात वर्षाची चिमुरडी सुद्धा स्वतंत्र विचार करते. मोठी झाल्यावर ती कुणाचेही, अगदी तिच्या बापाचेही म्हणजे माझेही ऐकणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि याचा मला अभिमान आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. स्वतः चे आयुष्य स्वतःच्या मर्जी प्रमाणे जगेल.
मराठी भाषेतील एकच शब्द निवड असे सांगतिले तर मी कोणता शब्द निवदेन माहित आहे? विवेक. माझा शाबूत आहे. पण अनेकांना असे काही असते हेच माहित नाही. झुंडीचे मानसशास्र घरातच तर जन्माला येते. विवेक कुठून जन्माला घालायचा?
#maheshwrites #marathi.