माझ्या लहानपणी मे महिन्याची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी मोठी सजा असायची. आजोळी लाईट नाही. आजोळची भाषा वेगळी. जेवणात पोळी नाही.
या उपर माझ्या मावशा, ज्या उठसुठ माझा दुस्वास करायच्या. माझी आई केवळ घरात जास्त शिकेलेली नाही तर जवळपासच्या सर्व खेड्यातील MA इंग्लिश झालेली पहिली मुलगी. माझ्या मावशा कमी शिकलेल्या. त्यांची विचार सरणी फार जुनाट. माझ्या आईच्या शिक्षणाची त्यांना अजिबात किंमत नाही. त्यातून त्या सगळ्या भल्या घरात पडलेल्या आणि आईला मात्र गरीब सासर मिळालेले. तिने नोकरी करून घर वर आणलेले.
एक मावशी म्हणायची आमच्या खानदानात कुणी तरी नोकरी केली आहे का. दुसरी म्हणायची की आम्ही कुणी माहेरच्या इस्टेटीत हक्क मागणार नाही. पण ह्याची आई मागेल. प्रत्यक्षात आई ने कधीही काहीही मागितले नाही. उलटपक्षी ती कमावती असल्याने तिनेच आई वडिलांना अनेक भेट वस्तू अगदी मनापासून दिल्या.
सगळा अपमान गिळून, आई माहेरच्या, आई-वडिलांच्या ओढीने जायची. आजी आजोबांनी आईला थोडे मोठे सोन्यातले कानातले घेऊन दिले होते. रोज उठून मोठे कानातले कुठे घालायचे म्हणून आई रोज रिंगा घालायची. एका मावशीने माझ्या आजीला सांगितले की तू दिलेले कानातले विकून टाकले तिने. हल्ली कानात फक्त रिंगा घालते. माझ्या आणि माझ्या आई विरुद्ध मावशा अशा आजीला भडकवायच्या. आजीने आईला त्या बाबत विचारले. आईने सत्य परिस्थिती सांगीतली. मग तेव्हा पासून, आई कायम माहेरी जाताना तिच्या आई वडिलांनी दिलेले तिचे मोठे कानातले घालून जायची. चोवीस तासांचा, तीन एस टी बदलून जायचा प्रवास असला तरीही. त्यापैकी मंगलोर बस stand वर दुसऱ्या गाडीची वाट पाहे पावेतो मला एक कोल्ड्रिंक (वर्षातले एकमेव) आणि मासिक मिळायचे. आजोळ बाबतीत तेवढीच एकमेव चांगली आठवण. बाकी माझे लहानपण माझ्या मावशांनी नासवले.
माझ्या घरात मोकळे वातावरण. प्रत्येक सदस्याला आपले मत मांडायची पूर्ण मुभा. असे काही मी मत मांडले की लगेच माझ्या मावशा, मला कसे वळण नाही हे म्हणायच्या. त्या माझ्या आई पेक्षा लहान असून तिला ताई, अक्का असे काहीही न म्हणता थेट नावाने हाक मारायच्या, तिचा अपमान करायच्या. तेव्हा त्यांना तरी वळण आहे का? असा प्रश्न मी आईला करायचो, तेव्हा ती मला म्हणायची की मोठे चुकले की त्यांना चुकले असे म्हणायची नाही. माझी आई माझीच कधीच बाजू घ्यायची नाही याचाही मला प्रचंड राग यायचा.
खेळता खेळता त्यांची मुले पडली तरीही, ‘ए महेश, काय केलेस रे?’ असे म्हणून आतून मावशा खेकसायच्या. त्यांच्या मुलांच्या परीक्षा झाली की त्या आपापल्या मुलांना घेऊन लगेच माझ्या आजोळी दाखल व्हायच्या. आम्ही मात्र निकाल लागल्यावर, आई ला सुट्टी लागल्यावर निघायचो. जाताना आई माझे report कार्ड कौतुकाने दाखवायला घेऊन जायची. ते पाहून मावशाना कौतुक वाटायचे की नाही कुणास ठाऊक. पण एकदा एक मावशी मात्र म्हणाली होती, ‘सगळ्या मुलांत आयुष्यात काही तरी मोठा महेशच बनेल.’
माझ्या घरी फार देव देव नाही. शिक्षणाला फार महत्व. त्यातूनही इंग्रजी शिकण्याला मात्र फार महत्व. अंधश्रद्धेला थारा नाही. माझी आजी इंदुमती सोवनी, स्वाभिमानी. गरीब तरी सगळ्यांचे तन, मन, धन सर्व प्रकारे करणारी. किती जणांची बाळंतपणे, आजारपणे तिने परिस्थिती नसतानाही घरी ठेऊन घेऊन प्रेमाने, आईच्या मायेने केली. त्याची जाण अर्थात सगळ्यांनी ठेवली नाही. ज्यांनी ठेवली त्यांनी इंदूताईने आमचे सगळे केले एवढे चार चौघात बोलून दाखवण्यात आणि ती गेल्यानंतर तिच्या अंत्य दर्शनाला येणे या पलीकडे ठेवली नाही. मला त्याचा ही प्रचंड राग यायचा. कशाला करते ही एवढे सगळ्यांचे. तिला तिचे due कधीच मिळणार नाही का? (आणि ते मिळाले ही नाही.) पण ती तशीच होती. निसर्गात समाजात न्याय नाहीच. म्हणून कायदे आवश्यक.
तर माझ्या घरी. सगळे बहुभाषिक. नेहमी पुस्तके वाचणारे. लिहिणारा मी एकटाच. आजोळी फार देव देव. माझे आजोबा त्यांचे ते देव देव करायचे. त्यांनी कधी मला त्यासाठी भाग पाडले नाही. आजी भोळी भाबडी. खेड्यातल्या बाईसारखी का रामायणातल्या कैकयी सारखी. पण अडाणी मावशाना हा ही एक मुद्दा मिळाला. मी कसे देव पूजा करत नाही, स्नान संध्या करत नाही वगैरे.
असेच एक दिवस मला शिव्या शाप देत एक मावशी भाजी चिरत होती. मनात विचार आला , चांगला हातच चिरू दे हिचा. मग दुसरा विचार आला मावशी आहे आपली, उगाच असला विचार करणे योग्य नाही.
‘सस….’ मावशी कळवली. खरेच तिचा हात कापला. पण सुदैवाने फार लागले नाही.
कुणाला वाटेल, हे असे कसे असू शकते. पण सत्य हेच आहे की जगात अनेक प्रकारची माणसे असतात. त्यातील काही आपल्या घरातही असतात.
मागच्या पिढीत पैसा दुर्मिळ होता. ज्याच्या कडे तो आहे त्याला जणू बाकीच्यांना कमी लेखायचा लायसेन्सच मिळायचा. तोंडाने चार स्तोत्रे म्हटली की झाले संस्कार असल्याचे प्रदर्शन.
मी फार जुळवून घ्यायचा प्रयत्न केला या सर्वांची अगदी आता आता पर्यंत. पण मलाच मनस्ताप व्हायला लागला.
लहानपणी पासून माझे एकच म्हणणे होते की सगळ्यांना नियम सामान हवा. मी लहान असलो तरी मला माझी बाजू मांडायचा अधिकार हवा. लता दीदीच्या गळ्यात जसा जन्मताच गंधार होता, तसा माझ्यात कायदा. अर्थात, तेव्हा माझे कुणीच ऐकायचे नाही, ना घरात, ना शाळेत. पण माझी अस्वस्थता वाढत चालली, त्यामुळे अन्यायाविरुद्ध सदैव चीड येत राहिली. प्रत्येक गोष्टीला दुसरीही एक बाजू असते, या बाबत मी आग्रही आणि परिणामी सर्व बाजू समजून घेण्याबाबत मी केवळ संवेदनशील नाही तर open ही राहिलो. मी कुठल्याही गोष्टींचा धिक्कार केला नाही. त्यामुळे, माझ्या अनेक मित्र मैत्रिणीनी त्यांची मने माझ्या जवळ मोकळी केली. ‘मला माहित आहे ही गोष्ट मी तुला सांगितली, तर तू समजून घेशील. इतरांसारखे उपदेशांचे डोस पाजणार नाहीस की माझ्या वागण्याला चुकीचे ठरवणार नाहीस. मी तुला ही गोष्ट सांगितली तरीही तू माझ्याशी मैत्री तोडणार नाहीस.’ असे म्हणून अनेकांनी मने मोकळी केली. आपण सगळे मर्त मानव आहोत. कुणीही आदर्श नाही. प्रभू राम एकच आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श ठेवला तरीही आपण त्यांच्या जवळ पास ही जात नाही. हे सत्य. मग का माणसांना असे जोखायचे. तराजूही तुमचाच, वजनही तुमचेच आणि मोजायचे मात्र दुसऱ्याला! त्याला मोजायचे तर त्याच्या काट्याने त्याला मोजा. तो काय परिस्थितीत तसे वागला ह्या वजनाने त्याला जोखा. आणि केवळ वयाने कोणी मोठे होत नसते. मी वयाने मोठा, म्हणून मला मान द्या असे मानणे सोडून द्या. लहानांकडूनही बरेच काही शिकण्यासारखे असू शकते, असते. मी माझ्या आयुष्यातील अनुभवांमुळे ह्या बाबती खूप संवेदनशील झालो आहे. मी नेहमी म्हणतो, माझ्या घरतील सगळ्यात समंजस व्यक्ती म्हणजे माझी सात वर्षांची लेक. जे आहे, ते आहे. ते म्हणायला, मान्य करायला मला अजिबात कमी पणा नाही.
आज मी फार पुढे का दूर निघून गेलेलो आहे. माझ्या नात्या ना गोत्याची अडाणी, शिकलेली, खेड्यातली, शहरातली लोकं माझ्यावर मनापासून प्रेम करतात. माझ्या विचारांचा केवळ आदरच करत नाहीत तर अगदी मला विचारवंत म्हणून त्यावर चिंतनही करतात. मग मी असे काही लिहिले की म्हणतात कशाला हे सगळे सांगायचे, ही बाजू समोर आणायची. तर ते ह्यासाठी जगातील सर्व लोक, अगदी rich and famous ही सुद्धा हाडा माणसांची माणसेच असतात. अगदी, इंदिराजीना सुद्धा मरे पर्यंत शल्य होते की त्यांच्या आत्यांनी त्यांना लहानपणी टोमणे नसते मारले तर त्यांचे आयुष्य खूप वेगळे असते. त्यामुळे लहान मुलांशी वागता बोलताना मोठ्यानी अधिक संवेदनशील असले पाहिजे. त्यांचे ऐकून घेतले पाहिजे. हे व्रण जन्मभरासाठी असतात.
फोटोत. - माझ्या आजीची (माझ्या वडिलांच्या आईच्या वाचनातली आणि मी अनेक घरे बदलूनही जीवापाड जपून ठेवलेली ) गीता. ती आज जिथे कुठे असेल, जरी तिला माझे वागणे, स्पष्टपणा आवडला नाही तरीही ती तिला माझ्या कामाचा अभिमान आणि कौतुक नक्की असेल, याची मला खात्री आहे.
#maheshwrites.