हात
मी हात शोधायला निघालो
ते तोडणारे हात
शोधत शोधत
जाऊन पोचलो
मित्राच्या घरात
म्हटले त्याला दाखव तुझे हात
त्याचे हात मी नीट पहिले
लहानपणी त्याच हातावर
होती लिमलेट ची गोळी
दाताने अर्धी अर्धी तोडलेली
हे हात नाहीत तोडणारे
मी म्हणालो.
कुणी तरी सांगितले होते मला
याच घरात, याच गल्लीत, मला सापडतील ते हात.
ते हात नाही राहिले आता,
तो म्हणाला.
सगळेच मातीत गेले
कोणीच नाही राहिले.
मग परत नवीन हात
कसे काय उगवले.?
का हात तेच
फक्त त्यांचा रंग वेगळा.
पुन्हा कोणी शोधत येईल हात
तेव्हा त्याला सांगशील
हात जमिनीत गेले तरी
पुन्हा जन्म घेतात
या हात जाण्या-येण्याला
काही अंत आहे की नाही?
तेही तुझ्याच हातात
विषय आणि वैर
जोवर संपवणार नाहीस
तो वर उगवतच राहतील
हजारो हात.
No comments:
Post a Comment