Free for download only on 4th and 5th March 2020

Tuesday, 24 May 2022

सुटत काहीच नाही


 

जंगलातून, दिव्य महात्म्यांच्या सहवासात काही चमत्कार घडतात का? असा प्रश्न कुणीतरी विचारला. आज मी जिवंत आहे, माझे श्वास चालू आहेत. मी हिंडू फिरू शकतो, मस्त मजेत. बस, याहून मोठा चमत्कार कोणता हवा? जेंव्हा माझे काही मित्र जे अकाली निघून गेलेले आहेत, तेंव्हा हा चमत्कार अजूनच अधोरेखित होतो.

 

आमच्या  चित्पावनी भाषेत कोणी वारले हे सांगण्यासाठी अमका तमका पुढे गेला, असे सांगण्याची पद्धत आहे. तो पुढे गेला, काही काळाने आपणही त्याला जॉईन होणार आहोत, म्हणून पुढे गेला असे म्हणायचे.

 

आपणही ही एक दिवस जाणार आहोत, आपल्या कडे ही वेळ मर्यादित आहे ही जाणीव असणे हा ही एक चमत्कारच आहे. मग समजते आयुष्यात कशाला महत्व द्यायचे आणि कशाला नाही ते. वेळेचा सदुपयोग तेंव्हाच खरा करता येतो.

 

रानावनात फिरतो ते बाहेरील चमत्कार पाहण्यासाठी नाही तर आत डोकावून पाहण्यासाठी. तसे तर रोजच, प्रत्येक क्षणी आत डोकावून पहिले पाहिजे, तेंव्हा कुठे रानावनातील निरव शांततेत तुम्हाला खोल आत पाहता येईल. नाहीतर मग mobile वर गाणे लाव, कुणाला तरी फोन लाव असे सुरु होते.  जसे काही मिनिटांच्या world record साठी खेळाडू रात्रंदिवस सराव करत असतो, तेंव्हा कुठे तो त्या लेवेल च्या स्पर्धेत उतरू तरी शकतो, अगदी तसेच. रोजचा सराव असेल, तरच एकांतात, दिव्य स्थानात काही तरी मिळते.

 

काही जण म्हणतील आम्हाला नको चमत्कार. आम्हाला तर ही सगळी कटकट सोडून निघून जायचे आहे दूर कुठे तरी. म्हणजे शांती लाभेल जरा.  सांग ना एखादा आश्रम.

 

भगवा चोला घातला म्हणजे काही सर्वज्ञान झाले असे नाही. ते दिव्य महात्मे सुद्धा अगदी आपल्यासारखे धडपडत असतात, चुकत चुकत शिकत असतात. प्रपंचाच्या विवंचना, सगळे सोडून दिले असले तरी, त्यांना ही असतात.

 

मागे एका खूप मोठ्या साधूने मला एका निर्जन स्थळी नेवून तो आश्रमासाठी घेवू इच्छित असलेली जागा मला दाखवली होती. तो मला उत्साहाने सगळे सांगत होता, दाखवत होता.  त्याच्या डोळ्यात तेच भाव होते जे एका नवीन घर घेणाऱ्या जोडप्याच्या असतील.

 

आणखी एका साधूला अरण्यातील त्याच्या कुटीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याची विवंचना होती. झाले असे कि त्याचे गुरूंचे शरीर पूर्ण झाले. याला त्यांचे सगळे दिवस कार्य करावे लागले. सगळ्या साधूंना अशा वेळी बोलवावे लागते, भंडारा करावा लागतो आणि मोठी दक्षिणा द्यावी लागते.

 

 

‘भंडारा चे काही नाही. कितीही लोकांना घालीन जेवायला. पण दक्षिणेत खूप पैसा खर्च होतो.’ तो म्हणाला. त्याचे सारे planning गुरूंच्या निधनाने बिघडले होते.

 

एका नदी किनाऱ्यावर असलेल्या आश्रमातील साधूंना बोअर मारायचे होते. पावसाळ्यात नदीचा रस्ता निसरडा होतो आणि पाणीही गढूळ. त्यांनी forest ranger ला ही पटवले होते. हे काम म्हणजे जंगलातील अतिक्रमण. Forest rangers अनेकवेळा त्यांना आश्रम बनवण्यापासून रोखतात. त्यांचे कामच ते असते. पण साधूही काही कच्च्या गुरुचे चेले नसतात. तेही पटवतात ह्यांना. तर ह्या साधूंनी पटवले ranger ला. काम बेकायदेशीर असल्याने रात्रीच्या वेळेसच करायचे होते. अशा बेकायदेशीर कामांना कामगार double rate घेतात. साधुबाबांची पैश्यांची जुळणी कमी पडत होती. मला म्हणाले देशील का काही हजार. Ranger राजी आहे तोवर काम उरकायला हवे.

 

माझे लक्ष समोरील hand pump कडे गेले. नुकताच एक भक्त त्यावरून पाणी भरून घेवून आला होता. मी म्हटले महाराज समोरच pump आहे, पुन्हा दुसरा कशाला? तर महाराज म्हणाले, ‘अरे तो दुसर्या साधूचा आहे. कधी तरी एकाद दोन बादल्या पाणी आणणे वेगळे. आपल्याला नको का स्वतंत्र hand pump?’

 

दुसर्या एका आश्रमात रात्री जेवण झाल्यावर ते गुरु माझ्याशी गप्पा मारत असताना, आतून शिष्याने विचारले. ‘गुरुजी, दूध खूप उरले आहे. दही लावू का?’ गुरुजी अर्थात हो म्हणाले. पण जंगलात जावूनही ह्यातून सुटका नाही याचे मला हसू आले.

 

साधूंचे एक मंडळ असते. म्हणजे एक संघटनाच म्हणू. अर्ज देवून त्याचे सदस्य व्हावे लागते. अर्जावर फोटो लावेलेला असतो. स्वताचे व गुरुचे नाव असते. सदस्यता शुल्क असते. मी पाह्लेल्या मंडळात प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क होते.

 

त्याही पुढे सदर मंडळात मतदान होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोष अधिकारी आणि सचिव निवडले जातात. मला भेटलेले साधू महाराज कोष अधिकारी होते.  मोठ्या प्रेमाने मला सगळे दाखवत आणि सांगत होते.

 

चित्रकूट येथील राघवदास महाराज मोठा अवलिया माणूस. वय सत्तर च्या आस पास. तोंडात फक्त पुढचे दोन शोभेचे दात. अंगावर फक्त एक लंगोटी आणि तोंडभर हसू. एका रणरणत्या दुपारी त्यांच्या झोपडी वजा आश्रमात खाटेवर पडल्या पडल्या मला म्हणाले होते. ‘वाटले होते, इथे आल्यावर सगळे सुटेल. पण छे सुटत काहीच नाही.’

 

टिप- मी काढलेला हा फोटो माझा सगळ्यात आवडता आहे. तो साधू तेथे बसला होता मस्त composition जमून आले. स्थान अर्थातच गुप्त.

1 comment:

  1. Hydration is essential for both physical health and mental performance. Adequate water intake helps regulate body temperature, supports digestion, enhances focus, and reduces fatigue. Yet, busy schedules and limited access to drinking water often make it difficult for people to stay properly hydrated.

    A water bottle with ample capacity effectively addresses this challenge. By holding enough water to last throughout the day, it minimizes the need for frequent refills, promotes consistent hydration, and allows users to stay energized and focused on their activities without interruption.s
    https://colornjoy.com/products/spooky-doll-halloween-water-bottle-coloring-activity
    https://colornjoy.com/products/dragon-adventure-water-bottle-kids-coloring
    https://colornjoy.com/products/space-crew-coloring-water-bottle-kids-educational-toy
    https://colornjoy.com/products/hedgehog-explorer-coloring-water-bottle-outdoor-toys

    ReplyDelete