असं काही तरी साप्ताहीक सुरु करावे असे बरेच दिवस मनात होते. पण म्हणतात ना सगळ्याची वेळ यावी लागते. मग म्हटले कशाला थांबून राहायचे एक तारखेची वाट बघत.नवीन वर्षाचे काही संकल्प करायचे असतील तर ते डिसेंबर मध्ये सुरु केले तर तडीस जाण्याची शक्यता जास्त.
तर यात मी दर आठवड्यात मी काय केले, कुठे गेलो, काय लिहिले, काय वाचले हे लिहित जाईन.
या रविवारी कंधारच्या किल्ल्याला जाऊन आलो. परंडा येथे चार वर्षे असल्यामुळे तेथील किल्ल्याला अनेक वेळा भेटी दिलेल्या. तिथला किल्ला आणि इथला किल्ला सारखाच. दोन सख्खे भाऊ असतात. कुणी त्यांच्याकडे बघून सांगू शकत हे दोघे भाऊ आहेत म्हणून. परंतु एक भाऊ जास्ती देखणा असतो. फिचर्स सारखे असले तरी त्याचे देखणेपण काही वेगळेच असते. तसा देखणा भाऊ परंडाचा किल्ला.
कंधारचा
किल्ला वाईट आहे असे नाही.
परंतु
किल्ल्याचा प्लान हा परंडाच्या
किल्ल्यासारखाच असल्यामुळे
मन सतत तुलना करत राहतं .
सरमकुंडी जवळ रामाईचे मंदिर हे अंबेजोगाईच्या सुप्रसिध्द योगेश्वरीच्या मंदिरासारखेच आहे. दोन्ही मंदिरे एकाच प्लान वरून, एकाच काळी आणि एकाच शासकाने बांधली असावी हे स्पष्ट आहे. ही दोन्ही मंदिरे सीता और गीता या जुळ्या बहिणींसारखी. दोन्ही देखणी. तिथे अशी तुलना होत नाही.
कंधारच्या किल्ल्यात जवळच्या शेतात मिळालेल्या जैन मूर्तीचे तुकडे ठेवलेले आहेत. एवढी मोठी मोठी पावले बघून ही मूर्ती उभी असेल तेव्हा किती विशाल असेल याचा अंदाज येतो. मूर्ती तोडणाऱ्यांबाबत वाईटही वाटते. एवढीही सौंदर्यदृष्टी नसावी त्या माणसांना याची कीव येते. माणसाला जे आपल्या हाताने बनवता येत नाही ते किमान तोडू तरी नये. असो...
या आठवड्यात वाचलेली पुस्तके( वाचलेली म्हणण्यापेक्षा संपवलेली म्हणणे जास्त संयुक्तिक राहील) To Kill a Mocking Bird, You are Not What You Think आणि भैरप्पा यांचे सार्थ.
या आठवड्यात पलीकडचा प्रकाशचा दुसरा भाग लिहून पूर्ण केलं. पलीकडचा प्रकाशच आधी मी इंग्रजीत MySpiritual Journey या नावाने २०१८ मधे लिहिलेले. अजूनही amazon वर kindle स्वरुपात आहे ते पुस्तक. त्यानंतर मग २०१९ मधे सुप्रसिध्द दिग्दर्शक बिजोय नांबियार याला नरेशन देण्यासाठी हिंदीत लिहिला. पण बात कूच बनी नही. नर्मदा माईलाच ही अध्यात्मिक रहस्ये जगासमोर यायला नको आहेत का, असे कुठे तरी वाटायला लागले होते. थोडे वैतागूनच त्याचे मराठीत रुपांतर केले. आणि rest is history.
मूळ कथा कशा लिहीताना मला माहितच नव्हते की पुढे काय होणार आहे, हे सगळे कुठे जाणार आहे. सगळं अनिश्चित. अवघड बाळंतपण होते. पण पार पडले सगळे व्यवस्थीत
पण या कथेचा दुसरा भाग लिहिणे मात्र प्रचंड त्रासदायक होते. पहिल्यापेक्षाही जास्त तापदायक. पण या आठवड्यात मी याचा ड्राफ्ट पूर्ण केला आणि मला अनपेक्षितरीत्या आणखी काही तरी मिळाले. त्या बाबत पुढे कधी तरी.
चांगल्या सवयी सुद्धा कधीकधी तापदायक ठरतात जसे की माझे पोहणे. गेले वर्षभर मी दररोज न चुकता पोहायला जात आ.हे सकाळी वेळ झाली की आपसूक पाय बाहेर पडतात व तरण तलावापर्यंत घेऊन जातात. कधी ठरवले आज नाही जायचे तरीसुद्धा आपसूक शरीर तिथे घेऊन जातेच. सवयींचे हे असे असते. हल्ली थोडी झोप पूर्ण होत नाहीये म्हणून जाणून बुजून ठरवलं नाही जायचं आज. जग इकडचं तिकडचं होऊ देत पण मी आज पोहायला जाणार नाही. नेहमीप्रमाणे पाचला उठलो. चहा पिऊन, वाचन करून परत झोपलो. चांगला पावणे नऊ वाजेपर्यंत झोपलो. चांगली झोप झाली. नाहीतर दिवसा जरा पेंग यायची. आता थोडे दिवस असा मस्त झोपणार आहे. नाही झाला व्यायाम तरी चालेल. वाढले थोडे वजन तरी चालेल.
#maheshwrites