Free for download only on 4th and 5th March 2020

Thursday, 12 December 2024

किल्ला, प्रकाश , झोप आणि बरंच काही

असं काही तरी साप्ताहीक सुरु करावे असे बरेच दिवस मनात होते. पण म्हणतात ना सगळ्याची वेळ यावी लागते. मग म्हटले कशाला थांबून राहायचे एक तारखेची वाट बघत.नवीन वर्षाचे काही संकल्प करायचे असतील तर ते डिसेंबर मध्ये सुरु केले तर तडीस जाण्याची शक्यता जास्त.

तर यात मी दर आठवड्यात मी काय केले, कुठे गेलो, काय लिहिले, काय वाचले हे लिहित जाईन.




या रविवारी कंधारच्या किल्ल्याला जाऊन आलो. परंडा येथे चार वर्षे असल्यामुळे तेथील किल्ल्याला अनेक वेळा भेटी दिलेल्या. तिथला किल्ला आणि इथला किल्ला सारखाच. दोन सख्खे भाऊ असतात. कुणी त्यांच्याकडे बघून सांगू शकत हे दोघे भाऊ आहेत म्हणून. परंतु एक भाऊ जास्ती देखणा असतो. फिचर्स सारखे असले तरी त्याचे देखणेपण काही वेगळेच असते. तसा देखणा भाऊ परंडाचा किल्ला.




कंधारचा किल्ला वाईट आहे असे नाही. परंतु किल्ल्याचा प्लान हा परंडाच्या किल्ल्यासारखाच असल्यामुळे मन सतत तुलना करत राहतं .

सरमकुंडी जवळ रामाईचे मंदिर हे अंबेजोगाईच्या सुप्रसिध्द योगेश्वरीच्या मंदिरासारखेच आहे. दोन्ही मंदिरे एकाच प्लान वरून, एकाच काळी आणि एकाच शासकाने बांधली असावी हे स्पष्ट आहे. ही दोन्ही मंदिरे सीता और गीता या जुळ्या बहिणींसारखी. दोन्ही देखणी. तिथे अशी तुलना होत नाही.



कंधारच्या किल्ल्यात जवळच्या शेतात मिळालेल्या जैन मूर्तीचे तुकडे ठेवलेले आहेत. एवढी मोठी मोठी पावले बघून ही मूर्ती उभी असेल तेव्हा किती विशाल असेल याचा अंदाज येतो. मूर्ती तोडणाऱ्यांबाबत वाईटही वाटते. एवढीही सौंदर्यदृष्टी नसावी त्या माणसांना याची कीव येते. माणसाला जे आपल्या हाताने बनवता येत नाही ते किमान तोडू तरी नये. असो...


या आठवड्यात वाचलेली पुस्तके( वाचलेली म्हणण्यापेक्षा संपवलेली म्हणणे जास्त संयुक्तिक राहील) To Kill a Mocking Bird, You are Not What You Think आणि भैरप्पा यांचे सार्थ.

या आठवड्यात पलीकडचा प्रकाशचा दुसरा भाग लिहून पूर्ण केलं. पलीकडचा प्रकाशच  आधी मी इंग्रजीत MySpiritual Journey या नावाने २०१८ मधे लिहिलेले. अजूनही amazon वर kindle स्वरुपात आहे ते पुस्तक. त्यानंतर मग २०१९ मधे सुप्रसिध्द दिग्दर्शक बिजोय नांबियार याला नरेशन देण्यासाठी हिंदीत लिहिला. पण बात कूच बनी नही. नर्मदा माईलाच ही अध्यात्मिक रहस्ये जगासमोर यायला नको आहेत का, असे कुठे तरी वाटायला लागले होते. थोडे वैतागूनच त्याचे मराठीत रुपांतर केले. आणि rest is history.

मूळ कथा कशा लिहीताना मला माहितच नव्हते की पुढे काय होणार आहे, हे सगळे कुठे जाणार आहे. सगळं अनिश्चित. अवघड बाळंतपण होते. पण पार पडले सगळे व्यवस्थीत

पण या कथेचा दुसरा भाग लिहिणे मात्र प्रचंड त्रासदायक होते. पहिल्यापेक्षाही जास्त तापदायक. पण या आठवड्यात मी याचा ड्राफ्ट पूर्ण केला आणि मला अनपेक्षितरीत्या आणखी काही तरी मिळाले. त्या बाबत पुढे कधी तरी.

चांगल्या सवयी सुद्धा कधीकधी तापदायक ठरतात जसे की माझे पोहणे. गेले वर्षभर मी दररोज न चुकता पोहायला जात आ.हे सकाळी वेळ झाली की आपसूक पाय बाहेर पडतात व तरण तलावापर्यंत घेऊन जातात. कधी ठरवले आज नाही जायचे तरीसुद्धा आपसूक शरीर तिथे घेऊन जातेच. सवयींचे हे असे असते. हल्ली थोडी झोप पूर्ण होत नाहीये म्हणून जाणून बुजून ठरवलं नाही जायचं आज. जग इकडचं तिकडचं होऊ देत पण मी आज पोहायला जाणार नाही. नेहमीप्रमाणे पाचला उठलो. चहा पिऊन, वाचन करून परत झोपलो. चांगला पावणे नऊ वाजेपर्यंत झोपलो. चांगली झोप झाली. नाहीतर दिवसा जरा पेंग यायची. आता थोडे दिवस असा मस्त झोपणार आहे. नाही झाला व्यायाम तरी चालेल. वाढले थोडे वजन तरी चालेल.

#maheshwrites


Sunday, 4 February 2024

kala

 

सध्या gathering चे दिवस आहेत. लहान लहान मुलांचे ग्रुप डान्सचे विडीयो आई बाप awesome performance, खतरनाक performance अशा विशेषणांनी status ला ठेवत आहेत.


माझा एक मित्र आहे. तो त्याच्या ७-८ वर्षाच्या मुलाचे डान्स आणि गाण्याचे विडीयोस वर्षभर स्टेट्स ला घालत असतो. मुलाला गाण्याचे आणि नृत्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. आताचे गाणे कर्णकर्कश्य आहे. लोक छान, छान अशा खोट्या comments देतात आणि तो खुश होतो.


मुल काही सर्वांसमोर मिरवावे अशी trophy नाही. त्याचे त्याचे व्यक्तिमत्व आहे. ते मोठे होईल तसे तसे ते घडत जाईल.


शिवाय प्रशिक्षण हवे म्हणून मुलांना ढीगभर क्लास ला घालावे अशा मताचाही मी नाही. कारण काही गोष्टी शिकायला आणि समजायला सुद्धा एक वय आणि योग्य गुरु असावा लागतो, मग तो नाच असो की गाणे.


फक्त फिल्मी नाचच होतात का gathering ला हल्ली? बाकी कला, छंद तर कधीच गायब झालेत. आम्हाला तर तोंडी परीक्षांना सुद्धा story telling असयाचे. आता तर परीक्षेलाही ते नसते.


त्यात मोठ्या माणसांच्या संगीतच्या नाचांची भर पडली. सिनेमातला नाच छान दिसतो कारण तो वेगवेगळ्या shots मधून घेऊन मग एडीट केलेला असतो.


सिनेमा किंवा नाचाशी माझे कोणते ही वावडे नाही. मला फक्त ही जाणीव करून द्यायची आहे की त्याचे विडीयोस टाकून आलेल्या comments फार काही सिरीयसली घेऊ नका.


जगासमोर आपली कला समोर आणण्याची घाई करू नका. आयुष्याचा अनुभव, साठलेली बेचैनी, ही कलेला अस्सल आणि रसरशीत बनवत असते. मी वयाच्या अठराव्या वर्षा पावेतो स्टेजवर पाउल ठेवले नाही. आणि मग ठेवले तेव्हा काही तरी अस्सल, काही तर नवे , एवढ्या वर्षाचे साठलेले आणि मुरलेले घेऊनच. लिखाणाचेही तसेच. जरी अगदी आठवी पासून महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्रातून माझे लिखाण छापून येत असले तरी कधी घाई केली नाही.


कला अशी चकल्या पडल्यासारखी नाही पाडता येत. ती लोणच्या सारखी मुरावीच लागते.

#maheshwrites

Monday, 15 January 2024

हात

 


हात


मी हात शोधायला निघालो

ते तोडणारे हात


शोधत शोधत

जाऊन पोचलो

मित्राच्या घरात

म्हटले त्याला दाखव तुझे हात


त्याचे हात मी नीट पहिले

लहानपणी त्याच हातावर

होती लिमलेट ची गोळी

दाताने अर्धी अर्धी तोडलेली


हे हात नाहीत तोडणारे

मी म्हणालो.

कुणी तरी सांगितले होते मला

याच घरात, याच गल्लीत, मला सापडतील ते हात.


ते हात नाही राहिले आता,

तो म्हणाला.

सगळेच मातीत गेले

कोणीच नाही राहिले.


मग परत नवीन हात

कसे काय उगवले.?

का हात तेच

फक्त त्यांचा रंग वेगळा.


पुन्हा कोणी शोधत येईल हात

तेव्हा त्याला सांगशील

हात जमिनीत गेले तरी

पुन्हा जन्म घेतात


या हात जाण्या-येण्याला

काही अंत आहे की नाही?


तेही तुझ्याच हातात

विषय आणि वैर

जोवर संपवणार नाहीस

तो वर उगवतच राहतील

हजारो हात.

Sunday, 26 November 2023

Constitution Day

 

निवाला मी मारत वगैरे नाहीच. तिच्या आईचा हात चालतो. पण त्यास माझा कट्टर विरोध आहेच. वयोमानाप्रमाणे निवाला सध्या अखंड खेळायचे किंवा tv बघायचा असतो. त्या मुळे होस्टेल ला ठेवीन. तिथे सगळी कामे स्वतःची स्वतःलाच करायला लागतात. फक्त रविवारी एकच दिवस TV बघयला मिळतो. वगैरे वगैरे मी सध्या सांगत असतो.


आज असेच तासानंतर TV मी बंद केला. तिला अर्थात राग आला जो तिने जोरात हुं… म्हणून व्यक्त केला.

'अपर्णा रामतीर्थकर म्हणायच्या की लहान असताना वडिलांचा धाक, तरुणपणी नवऱ्याचा धाक आणि आजीच्या वयात कर्त्या मुलाचा धाक असलाच... पाहिजे.’ मी म्हणालो.

धाक म्हणजे सगळं तुझं ऐकायचे असे का?’ तिने विचारले. मी हो म्हणाल्यावर म्हणाली, ‘काय स्वातंत्र्य वगैरे आहे की नाही मला?’


संविधान दिना दिवशी हे ऐकून मला काय बरं वाटलं म्हणून सांगू. हवा एवढा TV बघायचे स्वातंत्र्य तिला मिळायचे तेव्हा मिळेल. बाप म्हणतो म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलगा किंवा अन्य कोणी म्हणते म्हणून ही पोट्टी काही करणार नाही. योग्य पेरलंय, आणि ते अपेक्षे प्रमाणे वाढते आहे.


उद्या मिरे वाटणार आहे तुझ्या डोक्यावर.’ माझी एक दुष्ट मावशी काही वर्षा पूर्वी म्हणाली होती. म्हणावे वाटत होते, तुझ्या शब्दा बाहेर नसणाऱ्या मुलाने तुला न जुमानता त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीची लग्न केलेच की! तेव्हा नाही का मिरे वाटले गेले तुझ्या डोक्यावर.


खरे तर प्रत्येकाच्या डोक्यावर मिरे वाटलेच गेले पाहिजेत. जरा डोक्याला झिणझिण्या आल्या की तरी मेंदू काम करेल, विवेक जागा होईल आणि स्वतंत्र विचार जन्माला येईल. #maheshwrites

Thursday, 5 October 2023

दोन दिवस don diwas


 संपूर्ण कथा इथे वाचता येईल

See saw


माय मराठीची सेवा करता आली ह्य हून मोठे भाग्य नाही. माझ्या कथा वेगळ्या आहेत, तरल आहेत. अशा compliments नेहमीच मिळतात. मी वेगळा आहे आणि माझ्या संवेदनाही, जगाकडे पहायचा दृष्टीकोन ही.


मी काळा का गोरा हे ही माहित नसलेले रसिक वाचक जेव्हा इमेलने कथा आवडल्याचे सांगतात, तेव्हा ते सगळ्यात मोठे अवार्ड असते.


कौतुक आणि यश यात फार मोठा फरक आहे. कौतुक आपले लोक करतात. यशाला वशिला नसतो. ते जिथे उभे राहते, तिथे त्याला सन्मान मिळतो.


यश अगदी सुरवातीपासून माझ्या सोबत असले तरी माझे असे कौतुक फारच कमी झाले. कधी मामा, मावशा, काका यांनी कौतुक केल्याचे आठवत ही नाही. माझे लिखाण महाराष्ट्र टाईम्स सारक्या दैनिकात अगदी आठवीत असल्यापासून येत असूनही. आईच्या माहेरचा एक whatsapp ग्रुप आहे. त्यात देवा धर्माचे फोटो शेअर केले जातात. एक काका दोन धर्मात तेढ निर्माण करणारे video ही घालतात. पण माझ्या छापून आलेल्या लिखाणाचे आईने काही घातले की अगदी इगनोर करतात. सुरवातीला वाईट वाटायचे. पण आता जशी fan mails वाढलीत तसे नाही वाटत काही. मी ही आता बदला घ्यायचा म्हणून नाही पण त्या ग्रुप मधील दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स report करायला सुरुवात केली आहे. त्या मी एरव्हीही करतोच.



Outlook, Hindustan Times, Daily Tribune, Chandamama माझे लिखाण छापू लागली तेव्हा तुझे शिक्षण काय इंग्रंजी माध्यमात झाले, म्हणून तुला जमते म्हणून नाके मुरडली. आता मराठीत लिहायला लागल्यावर काय म्हणतात कोण जाणे. पण काही म्हणायलाच नाही म्हणूनच की काय आणखी जळफळाट वाढला आहे.


वेरूळ चे लेणे फक्त छिनी आणि होतोड्याने कोरले. म्हणून काय तुम्हा आम्हाला दिला छिनी आणि हातोडा म्हणून येईल कैलास कोरायला. तसेच येईल का नुसते एखाद्या माध्यमात शिक्षण झाले म्हणून त्यात साहित्य कृती करायला. माझ्या शाळेत सहा तुकड्या होत्या. तरीही माझ्या शाळेतील कुणीही लेखक नाही. माझ्या मराठी माध्यमात शिकलेल्या मित्रात ही कुणीही लेखक नाही.


असो, माझे मनोस्वास्थ्य आता मी गमावणार नाही. काही लोकांचे नंबर कायमचे डिलीट करून टाकलेत काही महिन्यांपूर्वी. त्या ही पेक्षा किती तर पटीने ज्यास्त लोक फोन मधेच नाही तर आयुष्यात आलेत आणि दिल के करीब झालेत. कोणतीही अपेक्षा, नात्याचे कसलेही ओझे नसताना.


ज्यात तुम्ही माझे फेसबुकचे वाचक ही आहात. तुमच्या प्रतिसादामुळे माझे मराठीत पुनरागमन झाले. आणि अनेक वेगळ्या, तरल आणि संवेदनशील कलाकृती मला निर्माण करता आल्या. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

सी सॉ ही कथा खालील लिंक वर वाचता येईल

अनुभव ऑक्टोबर 2023